परिचय

निमंत्रक — महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली-२०२६

मा. आर. विमला या भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी असून सध्या त्या सचिव, महाराष्ट्र शासन तथा निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यांचा प्रशासकीय प्रवास आणि साहित्यिक आवड यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे.

संवेदनशील प्रशासन आणि सृजनशील लेखणी : माझा प्रवास

शासकीय सेवेत प्रवेश मिळवणे म्हणजे केवळ परीक्षा उत्तीर्ण होणे नव्हे. ती एक दीर्घ आणि सातत्यपूर्ण तपश्चर्या असते. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा असो किंवा संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा, यापैकी कुठल्याही परीक्षेचे तिन्ही टप्पे यशस्वीरित्या पार पडणे म्हणजे वर्षानुवर्षांच्या परिश्रमांचे फळ असते. लाखो उमेदवार या परीक्षा देतात, मात्र फार कमी उमेदवार यात यशस्वी होतात. यशस्वी झालेले विद्यार्थी कठीण प्रवासातून जात असताना केवळ प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत नाहीत, तर समाजाच्या जडणघडणीत भूमिका बजावत असतात.

महाराष्ट्र ही संतांची, विचारवंतांची आणि योद्ध्यांची भूमी आहे. या मातीने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महाराणी ताराराणी अशी महान व्यक्तिमत्वे घडवली. महाराष्ट्रातील अनेक अधिकारी लेखक, कवी, कथाकार, निबंधकार आणि वक्ते म्हणून परिचित आहेत. शेतकऱ्यांच्या वेदना अनुभवलेला अधिकारी जेव्हा कविता लिहितो, तेव्हा त्यात कष्टाचा अनुभव असतो मात्र त्याचवेळी मातीचे ऋणही असते.

प्रशासकीय प्रवास

अखिल भारतीय मराठी महिला अधिकाऱ्यांच्या संमेलनाच्या निमित्ताने मा. विमला यांच्या स्वतःच्या प्रवासाविषयी — स्पर्धा परीक्षेच्या जगात येण्यासंदर्भातली त्यांची वाटचाल शालेय वयात सुरू झाली. १९८६ मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर इतिहास विषयाची आवड अधिकच वाढत गेली. काही काळ त्यांनी इतिहासाच्या प्राध्यापक म्हणून कार्य केले.

युपीएससीसाठी तयारी करताना दोन प्रयत्नांमध्ये मुलाखतीपर्यंत पोहोचल्या; मात्र अंतिम यश मिळाले नाही. मराठी भाषेचा अडथळा पार करत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि वर्ग १ विक्रीकर अधिकारी म्हणून पहिली नियुक्ती झाली. त्यानंतर उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना जमीन महसूल व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन, रोजगार हमी योजना आदी क्षेत्रांचा अनुभव घेतला. दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली.

२००९ मध्ये UPSC द्वारे पदोन्नतीने भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) प्रवेश मिळाला — हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला.

उल्लेखनीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका अभियानाची (MSRLM) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बचत गटांचे जाळे उभे करणे, महिला शेतकऱ्यांना एकत्र आणणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे या गोष्टी केल्या. नागपूर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना कोरोना काळातील आव्हाने पेलली आणि त्यानंतर विक्रमी ३० हजार महिलांचा सहभाग असलेली मॅरेथॉन आयोजित केली.

समग्र शिक्षा अभियानात 'महावाचन स्पर्धा' राबवली — यात तब्बल एक कोटी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दिल्लीत सचिव व निवासी आयुक्त म्हणून महाराष्ट्राची पाककला, खाद्य, पोशाख अशा सांस्कृतिक घटकांना विविध उपक्रमांद्वारे राष्ट्रीय स्तरावर सादर केले. अलीकडेच आंतरराष्ट्रीय AI समिटमध्ये सहभागी होऊन बोलण्याची संधी मिळाली.

साहित्य आणि प्रशासन : एक बांधिलकी

तीन दशकांहून अधिक काळातील प्रवासात वाचन, लेखन आणि विविध संस्कृतीचा अभ्यास हा जीवनाचा अविभाज्य भाग राहिला आहे. नियमित ब्लॉग लेखन, विविध प्रदेशांतील सण, परंपरा आणि सामाजिक रचना यांवर सातत्याने लेखन केले जाते.

"प्रशासनात कार्यरत असलेल्या अनेकांना साहित्याची आवड असते मात्र ती व्यक्त होण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळत नाही. महिलांना तर घर आणि घराबाहेर असा दुहेरी संघर्ष असतो. अशा वेळी अखिल भारतीय महिला अधिकारी साहित्य संमेलन ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरते. काही वेळा अधिकाराने जे बदलता येत नाही, ते साहित्याने बदलता येते. कारण साहित्य थेट हृदयाला स्पर्श करते." — मा. आर. विमला